एखादा जवळचाच मित्र- मैत्रिण किंवा नातेवाईक बऱ्याच महिन्यानंतर भेटतात अन् त्यांच्या तोंडून अकस्मातरित्या प्रतिक्रिया निघून जाते. ती प्रतिक्रिया म्हणजे, ‘अरे तुझे गाल आता गुबगुबीत दिसायला लागलेत, लग्नानंतर बाळस धरायला लागलास, पोट सुटायला लागलं, कंबरेचा घेर वाढतोय आणि वजन वाढलंय, जरा आटोक्यात ठेवा…’ अशा एक ना अनेक प्रतिक्रिया मिळतात. यानंतर लक्षात यायला लागतं की, खरंच वजन वाढतंय. मग अमका डाएट फॉलो कर, तमका डाएट बघ, किटो डाएट सुरू कर, ग्रीन टी घे, स्लिम बेल्ट लाव, एकवीस दिवस उपवास कर, फक्त फळे खात जा, फास्ट फूड बंद कर, सकाळी-सकाळी गरम पाणी, लिंबू आणि मध घे, तृणरस, अल्कलाईन वॉटर आणि ॲलोवेरा ज्यूस… बाप रे बाप सल्ल्याची यादी अगदी रामायणातल्या हनुमानाच्या शेपटीसारखी वाढत जाते, जी संपता संपत नाही. मग याचं ऐकू की त्याच ऐकू. प्रत्येकजण आपला किंवा आपल्या ओळखीतल्याचा अनुभव मांडायला सुरूवात करतो. मग सहा महिन्यात दहा किलो वाढलेलं वजन सात दिवसांत कमी करण्याचे फंडे समोर येतात. एक ना धड भाराभार चिंध्या अशी गत होते अन् दर आठवडा किंवा पंधरवड्यानंतर वजन कमी करण्यासाठी अथवा फिटनेस ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. मात्र तात्पुरत्या बदलाशिवाय कायमस्वरूपी अपयशाशिवाय पदरात काहीही येत नाही. हाच बहुतांश प्रयोगाचा सार ठरतो. फिटनेस एक्सपर्टच्या नात्याने असे वाटते की, तुम्ही वजन कमी करण्यासाठी अथवा शरीर फिट ठेवण्यासाठी इन्सटंट उपाय कितीही केलेत तरीही नियमित वर्कआऊटला (व्यायाम) पर्याय नाही. साध्या अन् सोप्या भाषेत सांगावयाचे झाल्यास चरबी वाढू न देता खाण्याचा आनंद घ्यायचा असल्यास वर्कआऊटशिवाय पर्याय नाही. नाहीतर वाढीव चरबी मोजायला तयार राहा. होय, व्यायाम करायलाच हवा अशी मानसिकता असल्यास व्यायाम नक्की कधी, कुठे, किती आणि कसा करावा, याचे उत्तर शोधायला हवे. बहुतांशवेळा अनेकजण जिम, योगा, वॉकिंग, रनिंग किंवा खेळाला प्राधान्य देतात. जे अगदी बरोबरच आहे. पण..! एक आठवडा, पंधरा दिवस, महिनाभर तर काहीजण चक्क दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी सुरू केलेला व्यायाम बंद करतात. असे का होत असावे, हा प्रश्न कोणी स्वतःला विचारलाय का? काहीजणांनी स्वतःला हा प्रश्न विचारला असल्यास उत्तरही मिळाले असेल अथवा नसेल. या उत्तराने तुमच्यावर काही फरक पडो अथवा न पडो पण व्यायामाला ब्रेक नक्कीच लागला असावा, असा माझा अंदाज आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीराची क्षमता न जोखता व्यायामाला सुरूवात करणे. शरीराची क्षमता जोखणे अगदी सोप्पं आहे. पायऱ्या चढताना, चालताना, बसताना, उठाताना किंवा पळताना आपल्याला धाप लागणे, क्रॅम्प येणे, स्नायू दुखणे, अतिप्रमाणात घाम येणे असे बदल बघायला मिळतात. त्यानुसार आपण स्नायू, ह्रदय आणि उर्वरित शरिराशी संबंधित व्यायामाचा प्रोग्राम आपल्या फिटनेस एक्सपर्टकडून तयार करून घ्यायला हवा. त्याचबरोबर वर्कआऊट करताना किंवा केल्यानंतर आहार कसा असावा, हे ही समजून घ्यायला हवा. अर्थात कोणताही व्यायाम करण्यासाठी तुमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला आवश्यक घ्या. गरजेनुसार काही तपासण्याही जरूर करून घ्या. तुम्हाला कुठला व्यायाम किती प्रमाणात करायचा याचा अंदाज नक्कीच येईल. त्यानुसार प्रत्येक आठवड्याला ५ ते १० टक्के या प्रमाणात हळूहळू व्यायामात वाढ करायला हवी. ज्यामुळे व्यायामाचा तुम्हाला त्रास होण्याऐवजी आनंद घेता येईल. ज्या प्रमाणात वर्कआऊट करतांना त्यातील आनंद वाढत जाईल त्याप्रमाणात तुमच्या शारिरीक क्षमताही नक्कीच वाढतील. याला तुम्ही साध्या शब्दांत ‘सेल्फ ॲसेसमंट’ही म्हणू शकता. एकदा तुम्हाला लक्षात आले की, वजन कमी करण्यासाथी अथवा शरीर निरोगी ठेवण्यासाठी जगात कुठलीही इन्स्टंट जादूचा प्रयोग नसतो. साधारणतः तीन ते चार महिन्यांच्या काळानंतर व्यायाम तुम्हाला अंगवळणी पडतो. अशावेळी एकाच पठडीतला व्यायाम न करता फिटनेस एक्सपर्टच्या सल्ल्याने त्यात हळूवारपणे बदल करता येईल. आठवडाभराचा एक नवा प्रोग्राम तयार केल्यावर वर्कआऊटमध्ये नाविन्यता येते. यातील नाविन्यता टिकवून ठेवणेही महत्त्वाचाच भाग असतो. व्यायामात सातत्य ठेवल्यानंतर शिस्त आणि डाएट करेक्शन्ससाठी मदत होते. शिवाय शांत झोपेची किंमतही कळायला लागते. पावसाळा आता संपत आलाय, हिवाळा उंबरठ्यावर पोहोचलाय. तेव्हा हेल्थी समजल्या जाणाऱ्या ऋतुमध्ये लठ्ठपणा टाळून सदृढ व निरोगी आरोग्यासाठी व्यायाम करण्यासाठी सज्ज राहा. तुमच्या वर्कआऊटला शुभेच्छा.
लेखक: संजय पाटील (फिटनेस अँड वेलनेस कोच). रिलॅक्स-झील.औरंगाबाद




Leave a Reply